पुणेरी परंपरेशी नातं सांगणारा ‘तांदूळ महोत्सव’

    
|

Rice Festival_1 &nbs
 
कितीही भरपेट जेवण झाले तरी, सुगंधी तांदळाच्या भाताशिवाय त्याला परिपूर्णता येत नाही. हीच सवय हीच सवय आपण जोपासत आलो आहोत. गृहिणींच्या आणि एकंदरीतच कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा असणारा धान्य खरेदी हा विषय आणि त्यातही तांदळाचे महत्त्व लक्षात घेऊन पुण्यात कैक वर्षांची ग्राहक सेवेची परंपरा जोपासणाऱ्या ग्राहक पेठने साधारण २५-२६ वर्षांपूर्वी ‘तांदूळ महोत्सव’ या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली. या महोत्सवाबद्दल...
………………………………………………………
 
भारतीय परंपरेत एकत्र कुटुंबपद्धतीला आजही विशेष स्थान आहे. दोन किंवा तीन पिढ्यांचे कुटुंब एकत्रित नांदताना आजही अनेक ठिकाणी आपल्याला दिसते. विशेषतः शहरी भागांपेक्षा ग्रामीण भागात हे चित्र पाहायला मिळते. या एकत्र कुटुंब पद्धतीत राहत असताना संपूर्ण कुटुंबाला वर्षभर लागणाऱ्या काही घरगुती बाबींची तरतुद वर्षातून एकदाच वर्षभरासाठी करून ठेवण्याची पद्धत आपल्याकडे फार पूर्वीपासून आहे. यामध्ये प्रामुख्याने धान्याची साठवणूक हा प्रकार पाहायला मिळतो.
 
कुटुंबासाठी लागणारे वर्षभराचे धान्य एकदाच खरेदी करून, त्याला तेल-पाणी करून, ऊन दाखवून त्याची साठवणूक करण्याची परंपरा आपल्याकडे होती. ती आजही काही घरांमध्ये दिसते. अलिकडील काळात बदलत्या जीवनशैलीमुळे आणि वाढत्या विभक्त कुटुंब पद्धतीमुळे त्याचे प्रमाण खूपच कमी झालेले दिसते. मात्र असे असले, तरी जेवणासाठी लागणारे धान्य, त्यांची पारख, त्यांची गुणात्मकता या बाबींकडे आजही विशेष लक्ष दिले जाते. वाण सामानाची खरेदी करताना गहू, ज्वारी, दाळ, तांदूळ या दैनंदिन जीवनात दररोज लागणाऱ्या धान्यांबाबत आपण विशेष चौकस असतो.
 
घरातील देवाची पूजा असो अथवा एखाद्या मंगल कार्यासाठी लागणाऱ्या अक्षता.. तांदूळ हा लागतोच... तसेच हे समीकरण जेवणाच्या बाबतीतही आहेच की..! कितीही भरपेट जेवण झालेले असू देत, सुगंधी तांदळाच्या भाताशिवाय त्याला परिपूर्णता येत नाही. हीच सवय परंपरा म्हणून गाठीशी ठेवून आपल्या कित्येक पिढ्या ती जपत आल्या आहेत. गृहिणींच्या आणि एकंदरीतच कुटुंबाच्या जिव्हाळ्याचा असणारा धान्य खरेदी हा विषय आणि त्यातही तांदळाचे महत्त्व लक्षात घेऊन पुण्यात कैक वर्षांची ग्राहक सेवेची परंपरा जोपासणाऱ्या ग्राहक पेठने साधारण २५-२६ वर्षांपूर्वी तांदूळ महोत्सव या अनोख्या उपक्रमाची सुरुवात केली. चोखंदळ ग्राहकांना त्यांच्या आवडीप्रमाणे तांदळाची खरेदी करता यावी आणि तांदळाच्या अनेक जाती एकाच वेळी एकाच छताखाली रास्त दरात उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने हा महोत्सव सुरू करण्यात आला.
 
१९९३मध्ये ग्राहक पेठेमार्फत या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. चोखंदळ पुणेकरांनी ही संकल्पना उचलून धरली. साधारणतः नोव्हेंबर-डिसेंबर या कालावधीत तांदळाचा नवीन हंगाम सुरू होतो. महाराष्ट्रात तांदळाचे उत्पादन कमी होत असले, तरी अन्य राज्यातून होणाऱ्या आवकमुळे तुटवडा जाणवत नाही. शिवाय तांदूळ जेवढा जुना तेवढा तो खाण्यास चांगला लागतो, यामुळे इतर धान्यांची नसली, तरी तांदळाची साठवणूक करण्याकडे अनेकांचा कल दिसतो. या महोत्सवात पंजाब, दिल्ली, हरियाणा येथून बासमती व त्याचे उपप्रकार तसेच मध्य प्रदेशातून आंबेमोहर, कालीमुछ, इंद्रायणी इ. जवळपास ४५ तांदूळ जाती (तांदळाचे प्रकार) ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या जातात. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खजिना विहिरीजवळील स्काऊट ग्राउंड याठिकाणी हा महोत्सव भरवला जातो.
 
अगदी लहान बाळासाठी करतो तसा गरम मऊ भात असू दे, मुलांना आवडणारा पुलाव असू दे, आमटी-भात खाताना जिभेवर स्वाद रेंगाळणारा सुगंधी भात असू दे किंवा हॉटेलसारखी बिर्याणी करण्याची मुलांची फर्माईश असू दे. हर तऱ्हेचा, हर प्रकारचा भात किंवा भाताचे प्रकार करता येणारा तांदूळ या महोत्सवात मिळतो. कोहिनूर, जयराज, फॉर्च्युन यांसारख्या बासमती तांदळाच्या नामवंत जाती याबरोबरच आंबेमोहर, कोलम, इंद्रायणी यांसारख्या सर्वांच्या आवडत्या आणि सर्वत्र चालणाऱ्या तांदळाच्या जाती हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य असते.
 
पैश्यांची आणि वेळेची बचत हे या महोत्सवाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. या महोत्सवात मिळणारा हर प्रकारचा तांदूळ हा बाहेर मिळणाऱ्या तांदळापेक्षा रास्त दरात मिळतो. शिवाय त्यावर अनेक प्रकारच्या सूट मिळतात. बाहेर एकाच ठिकाणी तांदळाचे इतके सारे प्रकार मिळणे तसे अवघडच त्यामुळे आपल्या ठरलेल्या ठिकाणी असेल तो तांदूळ घेण्याकडे आपला कल असतो. इथे मात्र ४०हून अधिक जातींचे तांदूळ प्रकार एकाच छताखाली उपलब्ध होतात. त्यापैकी आपली आवड आणि अपेक्षा यानुसार आपल्याला हवा तो तांदूळ फार वेळ न लागता खरेदी करता येतो. थंडीचा मोसम लक्षात घेता या महोत्सवात सुकामेवा (ड्रायफ्रूट्स) घाऊक दरात उपलब्ध करून दिले जातात.
 
आणखी एका गोष्टीने हा महोत्सव आकर्षक वाटतो, ते म्हणजे या तांदूळ महोत्सवात विविध प्रकारच्या सूट, बक्षिसे आणि भाग्यवान विजेत्यांना विशेष भेट अशा अनेक ऑफर्स असतात. १०० किलोपेक्षा जास्त तांदूळ खरेदी केल्यास विनामुल्य घरपोच सुविधा, दररोज तीन भाग्यवान ग्राहकांना विशेष भेट, आठवड्यातील एका भाग्यवान ग्राहकाला आकर्षक साडी भेट आणि सर्वांत महत्त्वाची आणि आकर्षक भेट म्हणजे एका भाग्यवान ग्राहकास पैठणी साडी. या आणि अशा कैक बक्षिसांची लयलूट या महोत्सवात केली जाते. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नवीन वर्षाची सुरुवात म्हणजे ग्राहक पेठेच्या तांदूळ महोत्सवातील खरेदी आणि त्यासोबत मिळणारी आकर्षक बक्षिसे हे जणू पुण्यातील गृहिणींचे समीकरणच होऊन बसले आहे.